नाशिकच्या घटनेचा सत्य वृतांत – रिपब्लिकन पँथर्स जातीअंताची चळवळ, महाराष्ट्र

October 14, 2016

नाशिकच्या घटनेचा सत्य वृतांत

नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता ननावरे, रामदास उन्हाळे, शाहीर शंतनू कांबळे यांनी दूरध्वनीवरून दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग प्रचंड दहशतीखाली जगत आहे. सवर्णांच्या संघटीत टोळ्यांना सैराट हल्ले करायला पोलिसांनी आणि सरकारने मोकळे सोडलेले आहे. ठिकठीकाणी टोळ्यांच्या संघटीत हल्ल्यांच्या बातम्या एकापाठोपाठ एक अशा कानावर धडकू लागल्या आहेत. आत इथे, तर नंतर तिथे अशी बिकट परिस्थिती गावागावांमध्ये निर्माण झालेली आहे.

गावागावांमध्ये पोलीस तैनात आहेत. पण त्यांच्या डोळ्यादेखत हल्ले सुरु आहेत. प्रशासन पूर्ण ठप्प आहे. दलितांना जीव मुठीत घेऊन जगायला विवश केले आहे. आताच मिळालेल्या बातमीनुसार आज सकाळी साडे आठ वाजता उदयनराजे भोसले सिविल हॉस्पिटलमध्ये आले होते. व त्यांनी सर्वांसमोर फोनवरून पोलीस अधिकाऱ्यांना आंदोलन करणाऱ्या मराठा टोळ्यांना अजिबात हात लावू नका असाही इशारा दिला. त्याचबरोबर नाशिक मधील टी. व्ही. चेनल वाल्यांना या संघटीत हल्ल्यांच्या बातम्या टी.व्ही. वर दाखवू नका असा दम दिला. त्याच्या या खुलेआम धमक्यांनी टोळ्यांना दलितांवर हल्ले करायला उकसावले आणि परिणामी ग्रामीण नाशिकात संघटीत हल्ल्यांना उधाण येऊ लागले. हे सर्व हल्ले थंड डोक्याने पूर्वनियोजितच आहेत असे स्पष्टपणे म्हणण्याला तशीच ठोस करणे आहेत.

घटना :

तळेगाव – ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास पिडीत मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह किराणा दुकानातआली होती. पिडीत मुलगी वय ५ वर्षे आणि मोठी बहीण ७ वर्षाची आहे. त्यावेळी कथित १५ वर्षीय आरोपी रवी चव्हाण त्या दोघींना चॉक्लेट द्यायला आला व त्याने हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोठी बहीण घरी गेली व तिने आजीला कुणी मुलगा छोट्या बहिणीची छेड काढतो आहे असे सांगितले. तेव्हा आजी दुकानाकडे आली व तिने त्या मुलाच्या कानफटात वाजविली.

त्यानंतर तेथे शिवसेनेचा स्थानिक पुढारी तुकाराम दाते व मनसेचा रमेश खांडदहले या दोघांनी मोबाईलवरून दलित मुलाने मराठा मुलीचा बलात्कार केल्याचा मेसेज फिरवला आणि लोकांना गावात बोलावून घेतले. बघता बघता पाच-सात हजार लोकांचा जमाव जमला. पिडीत मुलीला गावातीलच एक डॉक्टर अमोल पाटील यांच्याकडे तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरने बलात्कार झाला नाही वा अतिप्रसंगही झाला नाही असे स्पष्ट केले. पण तरीही त्या दोन स्थानिक राजकारण्यांनी जमावाला कथित आरोपीचे नातेेवाईक असलेल्या बागायतदार …….. चव्हाण यांच्या घरावर हल्ला करायला चिथावले. जमावाने चव्हाण यांच्या घरावर हल्लाबोल केला व कुटुंबियांना मारहाण करायला सुरुवात केली. सामानाची नासधूस केली. दारात उभ्या असलेल्या ट्रेकटर व टू व्हीलर्स ना आगी लावल्या. दारं खिडक्या तोडून टाकले व घराला आग लावली. त्या दोन्ही राजकारण्यानी त्र्यंबक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून पोलिसांना गावात बोलावून घेतले व मुलाला अटक करून दिली. त्या दोघांच्याच अट्टाहासापायी पिडीत मुलीला सरकारी सिविल हॉस्पिटलला नेण्यात आले. जणू अटकेची ही बातमी हल्ला करण्याचीच नांदी होती. त्यानंतर लगेचच हजारो लोकांनी तळेगाव-त्र्यंबक येथे रास्ता रोको केला. त्यानंतर लगेचच काही मिनटात आठवा मैल येथे हजारावर लोकांनी रास्ता रोको केला. त्याच्या काही मिनटांनंतर गरवारे येथेही हजारावर लोकांनी रास्ता रोको केला; वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली; लोकांना मारहाण केली. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे प्रतीक चिन्ह असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कथित आरोपीच्या गावात दलितांना मारहाण होत असतानाच अशा उपरोक्त वेगवेगळ्या ठिकाणी एकापाठोपाठ हल्ले होणे, रास्ता रोको होणे हे पूर्णपणे नियोजित असल्याचेच सिद्ध करते. दोन महिन्यापूर्वी तुकाराम दाते याच्या १६ वर्षीय भाचीचा कथित आरोपीने दोन दलित व एक आदिवासी मित्रांसह पाठलाग केला होता. व त्या प्रकरणी गावातल्या लोकांनी त्या मुलांना मारहाणही केली होती. त्याच घटनेचा डूख तुकाराम दाते यांनी या न घडलेल्या घटनेचा वापर करून काढला.

पिडीत अल्पवयीन मुलीने स्थानिक आस्था या टी. व्ही. चेनल वर येऊन तिच्यावर काहीही झालेले नाही व तिला कुणी काहीही केले नाही असे सांगितले तर नाशिक च्या सिविल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलीचा तपास केल्यानंतर दिलेल्या वैद्यकीय अहवालात बलात्कार झाला नाही पण जमावाच्या दबावात येऊन अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला असे नमूद केले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी बलात्कार झाला नाही पण विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला असे टी. व्ही. वरून जाहीर केल्यामुळे वातावरण बिघडले आणि त्यामुळे दलितांवरील हल्ल्याला उधाण आले. वैद्यकीय अहवालात बलात्कार झाला नाही असे स्पष्ट झाल्यानंतरही कथित आरोपीवर IPC चे बलात्काराचे कलम आणि बाल लैंगिक अत्याचाराचे कलम लावण्यात आलेले आहे. कथितआरोपीचे कुटुंबीय मोलमजुरी करतात व मराठ्यांच्या घरी किरायाने रहात आहेत.

पिडीत मुलीचे कुटुंबही गरीब असून ते सुद्धा भाड्याने राहतात. कथित आरोपीचे नातेवाईकाच्या घरावर हल्ला झाल्यामुळे त्यांचे व इतर चार दलित कुटुंबांना आपला जीव मुठीत घेऊन पिंपळगावातील नातेवाईकांकडे आश्रयाला पळावे लागले. खरे पाहता या कथित आरोपीचे नातेवाईक असलेल्या बागायतदार चव्हाण कुटुंबाकडे ७०-८० एकर जमीन आहे आणि या शेत जमिनीवर मराठे लोक मजुरी करतात. यामुळे मराठ्यांचा या जमिनीवर डोळा आणि कुटुंबावर डूख असणे स्वाभाविक होते. म्हणून या कुटुंबाला पळवून लावण्याचे षडयंत्र याप्रकारे आखले गेले.

या प्रकरणातील कथित आरोपीचे वकिलपत्र घ्यायचे नाही असा ठराव मराठा वर्चस्व असलेल्या नाशिकच्या बार कौन्सिलने केला आहे.

१. जो गुन्हा घडलाच नाही त्याचा बनाव रचून या प्रकरणाला जाणीवपूर्वक जातीयवादी वळण देण्याचा प्रयत्न काही जातीयवादी शक्ती करीत आहेत.

२. या कथित गुन्ह्याचा आळ घेऊन राज्यशासनही आपले जातीवादी कार्ड खेळत आहे. आणि मराठ्यांची बाजू घेऊन मराठ्यांना दलितांवर हल्ले करायला मोकळे रान करून दिले आहे. आणि पोलीस दलित वस्त्यांमध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन करीत आहेत. दरवाजे तोडून, घरात घुसून महिलांनाही मारहाण करीत आहेत. याउलट मराठ्यांचा कुणी नेता नाही असे सांगून कुणाला पकडावे असा उफराटा प्रश्न पोलीस करीत आहेत.

३. क्षत्रिय मराठे आणि आर एस एस पुरस्कृत राज्यशासन या दोघांनी मिळून दलित विरोधी सुनियोजित हत्याकांडं घडविण्याचा घाट रचला आहे.

४. या पूर्वनियोजित हल्ल्यातील पीडितांना जिल्ह्याबाहेरील मदत मिळू नये यासाठी सामाजिक माध्यमांवर म्हणजे इंटरनेटवर बंदी घातली आहे.

५. शहीद रोहित वेमुलापासून ते उना हल्ल्यापर्यंत ब्राह्मण्यावादी टोळ्यांच्या प्रत्येक हल्ल्याचा मूंह तोड जवाब आंबेडकरी व पुरोगामी शक्तींनी दिला आहे. म्हणून या काळातील आंबेडकरी विद्रोहाच्या लाटेला चिरडून टाकण्यासाठी अशा

घटनांचा वापर केला जात आहे.

६. मराठा मूक मोर्चातून दलितविरोधी विषारी जहर पसरवले गेले त्यामुळेच धुळे असेल वा नाशिक असेल अशा हल्ल्यांना पेव फुटले आहे. जी परिस्थिती नामांतर आंदोलनाच्या काळात होती, आणि जसा सवर्णांनी मराठवाडा पेटवला होता तशीच परिस्थिती निर्माण करण्याची जातीवाद्यांचे आणि सरकारचे मनसुबे आहेत.

आपण काय करायला हवं ?

• आपण आपल्या शहरात त्वरित एक बैठक आयोजित करून त्यात घटना आणि उद्भवणाऱ्या बिकट परिस्थितीवर चर्चा घडवून आणणे.

• नाशिकच्या घटनेचे सत्य सार्वजनिक करणे.

• हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यासाठी शासनाला भाग पाडणे.

• वृत्त वाहिन्या, वृत्तपत्रे व इतर सामाजिक माध्यमातून सत्य उघडकीस आणणे व सवर्णांच्या एकतर्फी हल्ल्यांविरोधात आवाज बुलंद करणे.

• जातीवादी शासनाचा पर्दाफाश करणे.

– रिपब्लिकन पँथर्स जातीअंताची चळवळ, महाराष्ट्र

संपर्क :

१. शरद गायकवाड : ०९७०२७०७५८३

२. गौतम सपकाळे : ०९७३०५५६५६१

३. सुधीर ढवळे : ०७३०३१३४५३०